top of page
Writer's picturePanchakarma Chikitsalaya

"PC8- एक कुटुंब...आत्मिक नाते जिव्हाळ्याचे!"


कोरोनाच्या पहिल्या लाटेत जवळपास १ वर्ष सर्व रुग्ण तपासणी व कर्म यशस्वीपणे सुरु ठेवली होती.

पण दि. १९ एप्रिल २०२१ ला या कोरोनाने वडिलांनी घेतलेल्या Vaccination च्या रुपाने आमच्या घरात प्रवेश केला. मी, सारिका, कन्या मोक्षा व आई सर्व Covid Positive.... !

सारिका व मोक्षाला १ दिवस ज्वर, अल्प दौर्बल्य होते, आईला काहीही लक्षणे नव्हती. परंतु या Infection ला सर्वात जास्त बळी पडलो ते मी. एक दिवस ज्वर, तीव्र दौर्बल्य, विचित्र असा कास व श्वासकृच्छ्रता, क्षुधामांद्य, भारक्षय असा लक्षणसमुच्चय असताना या लढ्यात सर्व गुरुवर्य - वैद्य गाडगीळ सर, वैद्य धोपेश्वरकर सर, वैद्य संजय पेंडसे सर, वैद्य श्रीरंग गलगली सर, वैद्य संतोष भोर सर या सर्वांनी प्रयत्नांची शिकस्त करुन वैद्य सारिका मार्फत सर्व उपचार यशस्वीपणे करुन घेऊन मला यातून बाहेर काढले.

परंतु, १५ दिवसांनी पुनः कोविड उपद्रव स्वरुपात कास व सशोणित कफपतन, मलावष्टंभ, भगंदर पिटीका ते अर्श, दौर्बल्य, श्वासकृच्छ्रता असा प्रवास पुन्हा सुरु झाला. यावेळी मला व सारिकाला मोक्षासह मातृ-पितृवत् धोपेश्वरकर सर व वहिनींनी औंधला पंचकर्म चिकित्सालयात प्रवेशित केले. उद्देश आम्हा सर्वांना शारीरिक व मानसिक विश्रांती मिळावी, मनावरचे सावट दूर व्हावे आणि चिकित्सा व्यवस्थित व्हावी.


जेव्हा आम्ही PC8 मध्ये प्रवेश केला, तेव्हाच मला व सारिकालाही माहेरी आल्याची भावना झाली. खूप शांत व प्रसन्न वाटले. सरांचे दर्शन हिच चिकित्सा होती. जेव्हा सरांनी पाठीवरुन हात फिरवला तेव्हा डोळ्यात अश्रू आले. अतिशय कमी मनुष्यबळ असतानाही व PC8 वरील कामाचा नेहमीचा ताण असतानाही सरांनी व वहिनींनी आमची जबाबदारी घेतली आणि ही जबाबदारी PC8 च्या प्रत्येक व्यक्तीने यशस्वी पार पाडली.


सर्व सहाय्यक वैद्य - वैद्य Nancy - सर्व नियोजन करणे व त्याप्रमाणे ठामपणे ते सर्व मार्गी लावणे यात यशस्वी ठरतेच. वैद्य समृद्धि, वैद्य श्रुती यांची उत्तम साथ सर्वत्र होती. वैद्य निमिष व वैद्य शुभंकर यांनी अतिशय प्रेमाने कर्मचिकित्सा केली. आहार हेच औषध ! याचा अनुभव या २१ दिवसात आला. धोपेश्वरकर वहिनींनी घरुन रोज पाठविलेला वेगवेगळ्या प्रकारचा नाष्टा व पथ्यकर पण रुचीपूर्ण असा आहार याने मी आजारी आहे हेच विसरलो.

वहिनींच्या मार्गदर्शनाखाली पथ्यकर आहारात expert झालेल्या सुनीतातार्इ यांच्या हातचे जेवण करुनच माझा आजार निम्मा बरा झाला. मुंडे दादांनी फार्मसीचा व्याप सांभाळत माझ्या कर्माची तयारी केली व नियमितपणे अवगाहाचा काढा दिला.

धोपेश्वरकर सर व वहिनी यांच्या नित्य दर्शनानेच बरेचसे बरे वाटत होते. सर कधी येतील याची आम्ही आतुरतेने वाट पाहत असू. रात्री कितीही उशीर झाला तरी व कितीही दमलेले असले तरी सर भेटल्याशिवाय जात नसत. वहिनी तर रोज OPD संपली की येऊन सर्व विषयांवर गप्पा मारत असत.

आहार - Recipe पासून ते मोक्षाच्या श्लोक पाठांतरापर्यंत कितीतरी विषयांवर वहिनींशी गप्पा झाल्या.

दर रविवारी मिळणारे विशेष आतिथ्य !

रविवारी सर्व स्टाफला सुट्टी असल्याने एकटेपणा वाटेल की काय अशी भीती सरांच्या एका फोनने घालविली - घरी जेवायला येताय का? हे ऐकून खूपच आनंद झाला. वहिनींनी दर रविवारी केलेला स्पेशल बेत हा मला आजारपणापासून दूर नेत होता. घरी सर्वांशी गप्पा मारल्याने मागील एक महिन्याचा सर्व थकवा निघून जात होता. त्रिवेणी व कौशिक ही सोबत असायचे. कौशिकचे वादन, फोटोग्राफीतून पक्षीदर्शन, मोक्षाला वहिनींनी शिकवलेले विविध खेळ मनाला उभारी देत होते.

सरांच्या बाबतीत काय लिहावे ! हाडाचे वैद्य, उत्तम परीक्षण व निदान करणारे, चिकित्सेतील अचूकता, दूरगामी विचार करणारे तसेच प्रेमळ पित्याप्रमाणे सर्व विचारपूस करणारे अशा विविध रुपात सर पुन्हा पुन्हा भेटले!!!


एकंदरीतच हा २१ दिवसांचा विसावा हा कोणत्याही रुग्णालयात प्रवेश घेतल्यावर जशी भावना असते तसा अजिबातच नव्हता. खरेच PC8 हे एक कुटंबच आहे हे केवळ सरांच्या विद्यार्थ्यांनाच नाही तर सर्व रुग्णांनाही वारंवार जाणवते व तसा अनुभवही प्रत्यक्षात मिळाला.

आई वडील गुरू असतात पण गुरूंनी आई वडीलांप्रमाणे काळजी घेणे हे परम् भाग्य!!


हे PC8 चे कुटुंब व जिव्हाळ्याचे असे आत्मिक नाते असेच सतत वाढत जावो ही धन्वंतरी चरणी प्रार्थना !!!


- मोक्षा, वैद्य महेश व वैद्य सारिका भुजबळ



169 views0 comments

Recent Posts

See All

माझी व्याधीमुक्तता (नेहा सोनावणे , रुग्णा)

नमस्कार, मी एक २९ वर्षीय महिला असून मला ४ वर्षांचा एक मुलगा आहे. मी नोकरी करते. साधारण दिड दोन वर्षांपूर्वी अचानक माझ्या उजव्या बाजूच्या...

“घेता घेता एके दिवशी देणार्‍याचे हात घ्यावेत”

मी व रेणु देखिल महेशदादा आजारी होता त्यावेळी तीव्र ज्वर, संधीशूल, तीव्रतम कटीग्रह , कंठशूल-ग्रह व थोडा कास याने पीडित होतो. दरम्यान कोविड...

Comments


bottom of page