top of page

माझी व्याधीमुक्तता (नेहा सोनावणे , रुग्णा)

Writer: Panchakarma ChikitsalayaPanchakarma Chikitsalaya

नमस्कार,

मी एक २९ वर्षीय महिला असून मला ४ वर्षांचा एक मुलगा आहे. मी नोकरी करते. साधारण दिड दोन वर्षांपूर्वी अचानक माझ्या उजव्या बाजूच्या स्तनामध्ये हाताला जाणवेल अशी न दुखणारी एक गाठ तयार झाली. जेव्हा हाताला पहिल्यांदा जाणवली तेव्हा मी थोडं घाबरून गेले. दोन तीन दिवसांनी माझ्या नेहमीच्या स्त्रीरोग तज्ज्ञांना जाऊन भेटले आणि गाठ दाखवली. त्यांनी मला एका स्तन-विशेषज्ञ डॉक्टरांना दाखवण्याचा सल्ला दिला. गांभीर्य लक्षात घेऊन मी लगेच त्याच दिवशी संबंधित डॉक्टरांना जाऊन भेटले. पहिल्या भेटीत त्यांनी मला नक्की काय झालंय हे नीट सांगितले नाही. फक्त अशी गाठ येऊ शकते ती लवकर जात नाही व यावरील ट्रीटमेंट दीर्घकाळ चालणारी असते एवढी कल्पना दिली. तसेच अश्या प्रकारच्या गाठींवर रामबाण औषध नाहीये, एकदा गेलेली गाठ पुन्हा देखील उद्भवू शकते असेही त्यांनी मला सांगितले. या उपचारामध्ये स्टिरॉइड चा वापर करणे गरजेचे आहे. व स्टिरॉइड चे काही दुष्परिणाम असतात त्याची मला त्यांनी कल्पना दिली. दर १५ दिवसांनी गाठ दाखवायला येण्याबाबत त्यांनी मला सांगितले. मी चिंताक्रान्त होऊन घरी परतले व औषधे सुरु केली.

मी खूप घाबरले होते, ब्रेस्ट कॅन्सर बाबत मी ऐकून होते. काही उदाहरणे देखील डोळ्यासमोर पहिली होती. आपल्याला लहान मूल आहे. तशी काही गंभीर व्याधी असेल तर आपले आणि आपल्या कुटुंबाचे कसे होणार या विचारांनी मन व्याकूळ होत होते. 'मन चिंती ते वैरी न चिंती' हे मी या दिवसांत जवळून अनुभवलं.

आता स्तन तज्ज्ञांकडे माझ्या वाऱ्या सुरु झाल्या होत्या. एक दिवस तपासणीला गेले असता, मॅडम म्हणाल्या - खूप दिवस झाले तरी गाठ जात नाहीये तरी आपण ती गाठ पंक्चर करून त्यातले रक्त-पू असे सर्व तपासणी साठी प्रयोगशाळेत पाठवून ती गाठ नक्की कशाची आहे हे तपासू. मी अर्थातच 'हो' म्हणाले. माझी 'बायोप्सी' झाली. गाठ कॅन्सरची आहे का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याकरिता नमुने प्रयोगशाळेत पाठवले गेले. मी अत्यंत चिंताग्रस्त होऊन घरी परतले. ३ दिवस आणि ३ रात्री मी कश्या काढल्यात याची कुणीही कल्पना करू शकत नाही. ३ दिवसांनी मी पुन्हा त्यांच्या क्लीनिक मध्ये गेले. रिपोर्ट्स आले होते. सदर गाठ कॅन्सर ची नाही, साधीच आहे. हे मला त्यांनी अतिशय गंभीर चेहऱ्याने सांगितले. मला त्यांच्या मख्ख पणाचे आश्चर्य वाटले.

उपचार सुरु करून आता बरेच दिवस झाले. स्टिरॉइड आणि इतर औषधांचे डोस कमी जास्त करून माझ्या शरीरावर प्रयोग केले जात होते. त्याचे कधी ताक्तालीक फायदे तर कधी दुष्परिणाम मला भोगावे लागत होते. स्टिरॉइड मुळे वजन झपाट्याने वाढत होतं. डिप्रेशन वाढत होतं, चेहरा सुजला होता, अंगभर पुरळ आले होते. मी खूप कठीण काळातून जात होते. शारीरिक आणि आर्थिक ओढाताण होत होती. पण सगळाच प्रवास दिशाहीन होता. डॉक्टर तपासणीला भेटत तेव्हा १ मिनिट पण नीट बोलत नसत, चर्चा होत नसे, उपचारांबाबत मला नीट माहिती दिली जात नसे, एकूणच माझ्या मनाचा कोंडमारा होत होता. पण यातून जाण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. 'मॅडम' पुण्यातील नामांकीत Breast Specialist होत्या. पण गाठ काही केल्या जाईना.

दरम्यान गाठ आता दुखायला देखील सुरुवात झाली होती, वारंवार फुटत होती, रक्त व पू सतत बाहेर येत असे. कपड्यांमधून आतल्या बाजूने चिकचिक होत होती. आता रोज आतमध्ये कापूस पट्ट्या ठेवणे याची मला सवय झाली होती. शरीर स्टिरॉइड च्या भयंकर दुष्परिणामांना सहन करत होते. दिशाहीन उपचार चालूच होते. फायदा होत नव्हता उलट गाठ व जखमेची स्थिती चिघळत चालली होती. मी डिप्रेशन मध्ये जात होते. सगळ्याचा परिणाम कौटुंबिक स्वास्थ्य व ऑफिस मधील काम यावर होत होता.

दरम्यान मला डोकेदुखीचा त्रास सुरु झाला. स्टिरॉइड मुळे डोकं दुखू शकतं असं मला 'मॅडम' म्हणाल्या होत्याच. डोकं दुखलं कि डोकेदुखीची एक गोळी घ्यायची असा क्रम सुरु झाला. पण काही दिवसांतच मला असह्य डोकेदुखी सुरु झाली. गोळी घेऊनही थांबेना. एक रात्र अशी होती कि मी पूर्ण रात्र डोकं धरून बसले होते. असह्य त्रास होत होता. कुटुंबीयांसमोर ढसाढसा रडले. लगेच दुसऱ्या दिवशी 'मॅडम' कडे गेले. त्या म्हणाल्या कि तुम्ही न्यूरॉलॉजिस्ट ना दाखवा. नवरा सोबत होता. त्याने मला तातडीने न्यूरॉलॉजिस्ट कडे नेले. मला आता त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसू लागली होती. या सगळ्या उपचार प्रवासात माझ्या नवऱ्याने आतापर्यंत खूप धीर धरला होता. मलाही वेळोवेळी आधार तोच देत असे. पण हे सगळं बघून आता त्याचाही धीर सुटला होता.

न्यूरॉलॉजिस्ट ने तपासणी केली, दीर्घ काळ स्टिरॉइड घेत असल्याने मेंदू ला रक्तप्रवाह करणाऱ्या वाहिनीत गाठ, क्लोटिंग वा चोकअप असं काही होऊ शकतं असं त्या म्हणाल्या व ताबडतोब MRI स्कॅन चा सल्ला दिला. प्रकरण गंभीर होत चाललं होतं. मी व माझा नवरा प्रचंड काळजीत होतो. MRI केला. संध्याकाळी रिपोर्ट येणार होते. मधल्या काळात इष्ट देवतेचे दर्शन घेऊन आलो. रीपोर्ट आले. नॉर्मल होते. कोणतीही गंभीर बाब आढळून आली नाही. अती स्टिरॉइड सेवनामुळे डोकं दुखत होतं असं निदान झालं. या सगळ्या दिव्व्या मधून जात असताना सध्या घेत असलेल्या उपचारांविषयी प्रचंड शंका व राग आमच्या मनात निर्माण झाला होता. झालं तेवढं पुरे झालं. आता परत तथाकथित नामांकित ‘स्तनतज्ञ् मॅडम’ कडे परत जायचं नाही हे मात्र आम्ही दोघांनी ठरवलं. इतकंच नव्हे तर ऍलोपॅथी सोडून इतर काही पर्याय आहेत का हे बघायचे ठरवले.

माझा नवरा मिशन मोड वर पर्याय व उपाय शोधू लागला होता. आम्हाला यावर आयुर्वेदिक उपचार घेऊन बघा असे कुणी तरी सुचवले. आम्ही चांगले वैद्य शोधू लागलो. एका मित्राने वैद्य. श्री. त्रिलोक धोपेश्वरकर यांचे नाव सुचवले. व त्यांना दाखवण्याचा सल्ला दिला. लागलीच माझ्या पतीने वैद्यांच्या क्लिनिक मध्ये संपर्क साधून भेटीची वेळ घेतली. काही दिवसांनी आमचा भेटीचा दिवस उजाडला. आम्ही धोपेश्वरकर सरांना भेटायला पंचकर्म चिकित्सालय केंद्रावर पोहोचलो. सरांच्या सहायिकेने माझी दीर्घ मुलाखत घेतली. माझ्या जन्मापासून च्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीची त्या ताई नोंद करून घेत होत्या. बराच वेळाने स्वतः डॉक्टरांनी मला आत बोलावले. साधा सरळ माणूस, कोणताही बडेजाव नाही, विद्वत्तेचा आव नाही, सध्या भाषेत बोलून चर्चा करून माझी अडचण समजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न मला भावला. गेले वर्षभर ऍलोपॅथी च्या उपचारांमध्ये मी ज्या यातना सहन करत होते त्यावर या नवीन डॉक्टरांचं आस्थेवाईक बोलणं बघून मन अत्यंत शांत झालं, स्थिरावलं.

“काळजी करू नकोस, तू पूर्ण पणे बरी होशील. फक्त मी सांगितलेली पथ्य कटाक्षाने पाळ आणि मी दिलेली औषधे नियमाने घे.” मी खूप सुखावले. माझ्या स्तनांच्या या व्याधी मध्ये मला पहिल्यांदाच कोणी तरी तज्ञाने 'काळजी करू नकोस, तू बरी होशील'. असे म्हटले होते. आता उपचार घेण्याबाबत चा उत्साह माझात आला होता. नैराश्य गेले होते. डॉक्टरांशी दीर्घ चर्चा झाल्या नंतर आयुर्वेदाच्या मार्गाने आपण व्याधिमुक होऊ शकतो याचा पूर्ण आत्मविश्वास आता मला वाटू लागला होता.

उपचार सुरु झाले. खंडीभर औषधे नाहीत कि औषधांचा कसला दुष्परिणाम नाही. साधी एक पुडीभर पावडर होती. ती मी रोज घ्यायला सुरु केली. आणि सोबत कडक पथ्य-अपथ्य. महिन्यातून एकदा तपासणी. तसेच फोन वर कायम उपलब्धता. मला हि आपुलकी आवडली. गेल्या दिड वर्षात पहिल्यांदा मी शांत व निश्चिन्त झोपले. वैद्यांच्या सल्ल्याने आता स्टिरॉइड हळू हळू कमी आणि बंद केले जात होते. तस-तसं चेहऱ्यावरील सूज, वाढलेले वजन, अंगावरील रॅश कमी कमी होत होते. मी माझ्या मूळ स्वरूपात येत होते. जखमेत रोज थेम्ब भर तेल आणि एका जाड अगरबत्ती ने रोज जखमेला धूर दाखवणे या उपचाराची भर पडली. हे खूप वेगळं होतं. या मागची कारण मीमांसा मला वैद्यांनी विस्तृत सांगितली होती त्यामुळे हे सगळं करताना देखील आनंद वाटत होता.

वैद्य धोपेश्वरकर यांच्याकडे उपचार घ्यायला सुरु करून मला आता सहा महिने झाले आहेत. माझ्या स्तनावरील जखम दुसऱ्याच महिन्यात पूर्ण सुकली होती. गाठ आता हाताला लागत नाही. “वरवरच्या फायद्याने उपचार बंद करायचे नाहीत. तुला दुसऱ्या मुलाला स्तनपान करताना काही अडचण येणार नाही इतकी बरी मी करणार आहे” या वैद्यांच्या वाक्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आता सखोल व्याधी उच्चाटन सुरु आहे.

आधीच आयुर्वेदाकडे मी का गेले नाही याचा कधी कधी फार पश्चाताप होतो. आपल्या प्रातःस्मरणीय ऋषी मुनी पूर्वजांनी हजारो वर्ष कष्ट घेऊन आपल्यासाठी आयुर्वेद नावाचे सर्वात मोठे वरदान दिले आहे. त्याचा लाभ आपण घेतला पाहिजे.

धोपेश्वरकर सरांचे मनापासून धन्यवाद. मी आपले ऋण कधीही फेडू शकणार नाही.



नेहा सोनावणे , पुणे

 
 
 

Recent Posts

See All

Comments


Contact

020 2589 8294 / 02025897294 / 9403134413

©2020 by Panchakarma Chikitsalaya

bottom of page